अंधेरी येथील एका शैक्षणिक कार्यक्रमात आज नितीन गडकरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अंधेरी येथील ‘ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गर्व्हमेंट’च्या दीक्षांत समारंभात नितीन गडकरी म्हणाले, ‘पुढील निवडणुकीत मी माझे पोस्टरही लावणार नाही. कोणाला चहा-पाणी देणार नाही. मत द्यायची तर द्या, नाही तर नका देऊ.’नितीन गडकरींचे हे वक्तव्य आता सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.
राजकारणावर भाष्य करताना गडकरी म्हणाले, मी गेल्या 40 वर्षांपासून राजकारणात आहे. मात्र, मी कधी स्वत:चे कटआऊट लावत नाही व दुसऱ्याचेही लावत नाही. तरीदेखील मी निवडून नाही आलो का? आता तर पुढच्या निवडणुकीत मी ठरवले आहे. माझे नाव लोकांना माहिती आहे. त्यामुळे मी पोस्टरच लावणार नाही. कोणाला चहा-पाणीही देणार नाही. तुम्हाला मत द्यायची तर द्या, नाहीतर नका देऊ.पुढील निवडणुकीत मी पोस्टर लावले नाही, चहा-पाणी दिले नाही. तरीही लोक मला मते देतील. कारण निवडणुकीत लोकच मायबाप असतात. लोकांनाही चांगले काम करणारे, चांगली माणसं हवी असतात. त्यामुळे मला लोक मते देतील. मी एवढ्या. वर्षांपासून राजकारणात आहे. मात्र, आतापर्यंत मी कोणाच्या गळ्यात हार घातला नाही. माझ्या स्वागतासाठी एकही माणूस येत नाही. मला निरोप द्यायलाही कुणी येत नाही. चांगले काम करत असाल तर त्याची आवश्यकताही नाही.
गडकरी यांनी यावेळी ‘ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गर्व्हमेंट’ संस्थेला आवाहन केले की, चांगल्या लोकांना ट्रेन करा. गुणात्मक परिवर्तन करण्याची जबाबदारी तुमची आहे. गडकरी म्हणाले, मी भाजप अध्यक्ष असताना खासदार, आमदारांसाठी एक सिलॅबस तयार केला होता. तसा सिलॅबस तुम्ही नगरसेवकांसाठी तयार करा. 100 जणांमधून 4 जणांनी जरी चांगले काम केले तर ते यश असेल. यासाठी तुम्ही प्रयत्न करा.
लोकांना चांगली सेवा दिली तर लोक खिशातून पैसे देतील. त्यामुळे चांगली सेवा देण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे मत गडकरींनी व्यक्त केले. गडकरी म्हणाले, मुंबई-पुणे महामार्ग बांधला तेव्हा टोलच्या नावाने ओरड सुरू झाली होती. मात्र, त्यावर माघार न घेता महामार्गामुळे तुमचा वेळ वाचला, वाहतूक कोंडी कमी झाली, पेट्रोल डिझेलची बचत झाली ना. मग टोलचे पैसे द्या, असा मुद्दा मांडला. आता तर मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आणि सी लिंकचे पैसे वसूल झाले आहेत. लोकांना तुम्ही चांगली सेवा दिल्यास ते पैसे काढण्यास तयार होतील.